| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अकरा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर साखर चौथच्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर ही उत्कंठा संपली. जिल्ह्यामध्ये बुधवारी (दि.10) साखर चौथच्या 885 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मिरवणूक काढत बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. त्यात 390 सार्वजनिक, तर 495 घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे.
मूर्तीकार मूर्ती तयार करण्यामध्ये मग्न असल्याने गणेशोत्सवामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करता येत नाही. त्यामुळे दहा दिवसांच्या बाप्पांच्या निरोपानंतर साखर चौथच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, असे काही मंडळींकडून सांगण्यात आले आहे. तर, काही ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मित्रमंडळ एकत्र येत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून साखर चौथ गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे साखर चौथला गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्साह वाढू लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील हा क्रेझ वाढत आहे. ही परंपरा आजही कायम आहे. यावर्षीदेखील साखरचौथच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सकाळपासून बाप्पाच्या आगमनाची तयारी होणार आहे. काही ठिकाणी मिरवणूक काढत वाजत गाजत बाप्पाचे स्वागत केले जाणार आहे. तर, काही ठिकाणी बाप्पाला डोक्यावर आणत पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करण्यात येणार आहे.
दुपारपर्यंत विधीवत पूजा झाल्यावर मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी काही ठिकाणी संगीत खुर्ची, बाल्या नृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. साखर चौथच्या बाप्पाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मंगळवारी सायंकाळी गर्दी झाली होती. पूजेच्या साहित्यांसह फुले, फळे, सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र एक वेगळा उत्साह दिसून आला. या कालावधीत पोलीस ठाणे स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.







