पनवेलमध्ये गणेशमूर्ती दान संकल्पना

पर्यावरणपुरक गणेशोत्सवसाठी महापालिकेचे पाऊल

| पनवेल | वार्ताहर |

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने यंदा बाप्पा माझा पर्यावरणाचा राज हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत गणेशमूर्ती दान ही संकल्पना पनवेल महानगरपालिका प्रथमच राबवीत आहे. गणेशमूर्ती दान या उपक्रमाच्या माध्यमातून जलस्त्रोतांमध्ये साठून राहणारे प्लास्टर ऑफ पॅरिस व प्रदूषण करणारे रासायनिक रंगामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी पनवेल महापालिकेने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती दान हा महत्वाचा उपक्रम राबविला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात दीड दिवस, पाच दिवस व दहा दिवसांच्या सुमारे 20 हजार गणेशमूर्त्यांचे विसर्जन होते. यामध्ये जवळपास 180 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात व तलावात करू नये, यासाठी पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात पनवेल महापालिकेला विविध सेवाभावी संस्था, एनजीओ सहकार्य करणार आहेत. या उपक्रमासाठी तीन टप्प्यात नियोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होणार असून वाहतुकीवरील ताण देखील कमी होणार आहे.

पूर्वी गणेशमूर्ती मातीच्या अगर शाडूच्या असत. त्यांचे पाण्यात सहज विघटन होत असे. मूर्ती वनस्पतींच्या पानांपासून बनवलेल्या रंगांनी रंगवल्या जात होत्या. विहिरी आणि तळ्यांना मुबलक पाणी होते. लोकसंख्या कमी होती. त्यामुळे गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित करणे शक्य होते. परंतु बदलत्या काळानुसार शाडूच्या मूर्तींची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नाही. प्लास्टरमुळे पाण्यात प्रचंड गाळ साठतो, जिवंत झरे बुजतात. मूर्तींना लावलेल्या रासायनिक रंगांमुळे धोकादायक घटक पाण्यात मिसळतात. या धर्तीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या संकल्पनेतून गणेशमूर्ती दान हर उपक्रम राबविला जाणार असून पनवेलकर नागरिकांनी देखील उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

असे असेल नियोजन
महापालिका कार्यक्षेत्रातील 78 मोठ्या चौकांमध्ये मुर्तीदान व्यवस्था करण्यासाठी मंडप उभारण्यात येणार आहेत. यासाठी शंभराहून अधिक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असून दान केलेल्या गणेशमूर्त्या समुद्रात विसर्जन करण्यासाठी नेण्यासाठी मोठ्या वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. यासह 300 पेक्षा अधिक फ्लॅट असणार्‍या 36 सोसायट्यामध्ये तळमजल्यावरती मुर्तीदानासाठी विशेष व्यवस्था करणार आहे. यासोबतच सुमारे 26 ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या रात्री तलावामधील सर्व मूर्त्या बाहेर काढून 407 टेम्पो वाहनांमधून मोठ्या ट्रकमध्ये मूर्त्या एकत्रित केल्या जाणार आहेत. त्या नंतर मोठ्या ट्रकमधून गणेशमूर्त्या जेट्टीकडे नेऊन बोटीच्या साहाय्याने खोल समुद्रात नेऊन विसर्जन केल्या जाणार आहेत. यामुळे पर्यावरणासोबतच गणेशमूर्त्यांची होणारी विटंबना रोखणे हा देखील मुख्य आहे.

आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने आपण आजच पाऊले उचलणे आवश्यक आहे. आणि त्याचाच भाग म्हणून मबाप्पा माझा पर्यावरणाचा राजाफ ही संकल्पना पनवेल महानगरपालिका राबवित आहे. तरी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सर्व सोसायट्या व पनवेलकर नागरिकांनी या उपक्रमातत सहभागी होऊन समाजापुढे आदर्श निर्माण करावा.

गणेश देशमुख,
आयुक्त पनवेल महानगरपालिका
Exit mobile version