तीन वर्षांनंतर सांडपाणी, खड्ड्यांचे विघ्न सुटणार
। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी-दांड रस्त्यावरील गणेशनगर समोरील रस्त्याच्या उतारावरुन येणारे सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे आणि माजी सरपंच संदीप मुंढे यांनी ही समस्या लक्षात घेऊन वृंदावन फ्लोराकडे जाणारा रस्ता ब्रेकरने फोडून त्याखालून अंतर्गत सांडपाणी नाला काढण्याचे ठरविले. अखेर शुक्रवारपासून काम सुरू होऊन ब्रेकरच्या सहाय्याने सांडपाणी नाला काढण्यात आला व त्यात सहा मोठ्या व्यासाच्या मोर्या टाकण्यात आल्या. त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, चांभार्ली उतारावरील सांडपाणी, हरिओम पार्क, बालाजी हाईंट या परिसरातील वसाहतींना पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने हे सांडपाणी गणेशनगर समोरील रस्त्यावर साचायचे. परिणामी, रस्त्याला खड्डे पडल्याने वाहतूक खोळंबा व्हायचा. अखेर तीन वर्षांनंतर माजी सरपंच संदीप मुंढे आणि रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या प्रयत्नातून काम पूर्ण झाल्याने उतारावरील सांडपाणी मोर्यांवाटे रिस पुलाकडे काढले आहे. रसायनीकरांसमोरील महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी संदीप मुंढे आणि कैलास डोंगरे यांनी प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.