| खांदेश्वर | प्रतिनिधी |
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोमवारी (दि.14) पनवेल परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मोठमोठ्या गणेशमूर्ती मंडळाच्या आकर्षक सजविलेल्या मंडपांमध्ये विराजमान करण्यात आल्या. सोमवारी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला मंडपात आणले. दरम्यान, घरगुती गणपतींच्या आगमनासाठीही सकाळपासूनच नागरिकांची लगबग सुरू होती. महिला आणि बालकांनी बाप्पाच्या स्वागतासाठी घरांची आकर्षक सजावट केली होती. फुलांच्या माळा, रांगोळी आणि विद्युत रोषणाईने अनेक घरांचे अंगण सजले होते. काही कुटुंबांनी ढोल-ताशांच्या गजरात तर काहींनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणरायाचे स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात घराघरांत श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.






