। उरण । प्रतिनिधी ।
उरणमध्ये थेट सिलेंडरमधील गॅस चोरून दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरणारी सराईत टोळी कार्यरत असल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. थेट ग्राहकांच्या जीवाशी खेळणारा हा गोरखधंदा आता जनतेच्या जीवावर बेतणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
नुकत्याच घडलेल्या घटनेत, उरणमधील एका हॉटेल मालकाने हॉटेलमध्ये आलेल्या सिलेंडरचे वजन केले असता, गॅस कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकली. मात्र, पत्रकारांना माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घाईघाईने तो सिलेंडर बदलून दिला असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले. यापूर्वीही सिलेंडरांबाबत अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्याचे समजते. आता पुन्हा एकदा असा गंभीर प्रकार घडल्याने कंपनीच्याच कर्मचाऱ्यांच्या संगनमताने गॅस चोरीची टोळी सक्रिय असल्याची शंका बळावत आहे. ग्राहकांचा संताप ओसंडून वाहत आहे. सिलेंडर देताना वजन करून देणे बंधनकारक असतानाही, वजन न करता सिलेंडर देऊन निघून जाण्याची बेकायदेशीर पद्धत राबवली जात असल्याने उरणकर संतप्त झाले आहेत. सिलेंडरमधून गॅस चोरी करून जीवावर उदार होणारी ही टोळी उरणमध्ये कार्यरत आहे, हे स्पष्ट होत असून, या प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
