एमबीबीएस प्रवेशासाठी फसवणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी 32 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पकडण्यात आले. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून चौघांना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. त्यांना आठ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील अभिजीत वणिरे यांच्या मुलीला एमबीबीएसचे प्रवेश मिळवून देण्याचे अमिष सोमेन मन्ना याने दाखविले होते. त्याच्या अमिषाला बळी पडत वणिरे यांनी 32 लाख 50 हजार रुपयांची रक्कम त्याला दिली होती. मात्र मुलीचा प्रवेश झाला नाही. त्यामुळे त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग केला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, हवालदार प्रतिक सावंत, नाईक सचिन वावेकर, पोलीस शिपाई लांबोटे यांच्यासह सायबर सेलचे नाईक तुषार घरत, अक्षय पाटील यांचे पथक तयार केले. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला. फसवणूक करणारे ओरिसा राज्याच्या दिशेने हैदराबाद मार्गे चारचाकी वाहनाने जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांचा पाठलाग करून पश्चिम बंगालमधून त्यांना ताब्यात घेतले. चौघांना पकडण्यास त्यांना यश आले. या गुन्ह्यात आणखी तिघांचा समावेश असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

सोमेन मन्नाचीदेखील झाली होती फसवणूक
सोमेन मन्ना हा या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आहे. विशेष म्हणजे त्याची स्वतःचीही बीएड प्रवेशासाठी आणि नोकरीला लावण्यासाठी फसवणूक झाली होती. त्या अनुभवाचा वापर त्याने या गुन्ह्यात केला. प्रवेश मिळवून देण्यामध्ये फसवणूक केल्यास चांगले पैसे मिळतील असे त्याला वाटू लागलेे. त्यामुळे त्याने संगणकावर माहिती घेऊन अलिबागमधील वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे अमिष कोल्हापूर येथील वणिरे यांना दाखविले होते. त्यात दास नावाच्या साथीदाराच्या मदतीने वणिरे यांना आपल्या जाळ्यात अडकविले.
त्यांना माहित नव्हते वैद्यकीय विद्यालय
वणिरे यांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अलिबाग माहिती नव्हते. मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला होता. अलिबागमध्ये एका चारचाकी वाहनातून आल्यावर वैद्यकिय महाविद्यालय शोधत होते. त्यांना ते सापडत नव्हते. जिल्हा रुग्णालयाच्या जवळील टपरीवर वणिरे यांना बोलवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रविकिरण हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी तक्रारदाराकडून पैसे बळकाविले.
अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन
अलिबागमधील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने होते. प्रवेशासाठी कोणताही स्पेशल कोटा उपलब्ध नाही. त्यामुळे एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी केले आहे.
अलिबागची का केली निवड ?
सोमेन हा संगणकावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती घेतली.
 अनेक ठिकाणी त्याने संपर्क साधला. मात्र त्यात त्याला फारसे यश आले नाही. गुगलवरून माहीती घेताना अलिबागमध्ये विद्यालय असल्याचे समजले. कोल्हापूर येथील वणिरे यांच्याशी संपर्क साधून अलिबाग विद्यालय चालेल का, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर तक्रारदाराने विश्वास ठेवल्यावर आरोपीने अलिबागची निवड केली.
Exit mobile version