एमएसईबी ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर व अल्युमिनियमची कॉईल चोरी करणाऱ्या टोळीला अटक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून एमएसईबी ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर व अल्युमिनियमची कॉईल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी विविध 7 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. ही चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला यश आले आहे.

सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडून सुरु होता. सदर तपासा दरम्यान पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी रोहा, श्रीवर्धन, दिघीसागरी, म्हसळा, माणगाव, मुरुड, तळा पोलीस ठाणे कडील एकूण 12 गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेली 1480 किलो कॉपर कॉईल व 40 किलो अलुमिनियमची कॉईल तसेच सदर गुन्हे करताना आरोपीतानी वापरलेल्या 04 मोटार सायकली असा एकूण 13 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सागर शांताराम वाघमारे वय- 28, अक्षय शांताराम वाघमारे, वय-25, दिलीप वाघमारे,वय-35, शशिकांत वाघमारे वय-31, अनिल वाघमारे , वय-20, दत्ता वाघमारे , वय-20, संदीप पवार , वय-22 सर्व रा.देवकान्हे आदिवासी वाडी, पो. देवकान्हे, ता. रोहा. तसेच अक्षय तुकाराम वाघमारे , वय-25 अभिषेक विनोद शेळके , वय-22 दोघे रा. ठी./पो. उसरोली, ता. मुरुड यांचा समावेश आहे. या आरोपींकडून रोहा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, दिघी सागरी, माणगाव, तळा या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या आरोपींकडून 12 लाख 20 हजार रुपये किमतीची कॉपरची तार, 20 हजार रुपये किमतीची अल्युमिनियम ची तार त्याचप्रमाणे आरोपीनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या एक लाख रुपये किंमतीची एकूण 04 मोटार सायकली असा एकूण एकूण 13 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहा पो.ठाणे येथील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून दि. 01 जून 2022 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस हवालदार विकास खैरनार, पोलिस नाईक अक्षय जाधव, पोलिस शिपाई अक्षय सावंत, सायबर सेल चे पोलिस शिपाई तुषार घरत यांनी केली आहे.

Exit mobile version