खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी
| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील पहूर व जाधववाडी परिसरातील नियोजित एमआयडीसीच्या विकासकामाच्या ठिकाणी बेकायदेशीर टोळके जमवून कामगारांना मारहाण करत खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “आम्हाला कामावर ठेवा, नाहीतर पैसे द्या”, अशी दमदाटी करत एका टोळक्याने कामावर असलेल्या कामगारांवर काठीने हल्ला चढवून त्यांना गंभीर दुखापत केली आहे. तसेच, पुन्हा काम सुरू केल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड रेल्वे स्टेशन जवळ राहणारे तक्रारदार हे आपल्या सहकाऱ्यांसह रोहा तालुक्यातील पहूर आणि जाधववाडी येथे सुरू असलेल्या नियोजित एमआयडीसीच्या रस्ते विकासाचे काम पोकलेन व हायवा डंपरच्या साहाय्याने करत होते. काम सुरळीत सुरू असतानाच, एका संशयिताने इतर दोन मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून आपल्या 5 ते 6 साथीदारांसह घटनास्थळी बेकायदेशीर गर्दी जमवली. त्यानंतर या टोळक्याने तक्रारदार व उपस्थित कामगारांना अडवून, “येथील एमआयडीसीच्या कामामध्ये आम्हाला काम द्या किंवा आम्हाला पैसे द्या,” अशी जबरदस्तीने पैशांची मागणी केली. तक्रारदाराने यास असमर्थता दर्शवताच संशयित आरोपीने हातातील काठीने तक्रारदार व सहकाऱ्यांवर बेदम हल्ला चढवत त्यांना जबर मारहाण करून दुखापत केली. तसेच, “जर पुन्हा काम सुरू केले तर तुमचे हातपाय तोडून टाकीन,” असा थेट इशारा देखील दिला. यावेळी जमलेल्या इतर 5 ते 6 साथीदारांनीही अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत तक्रारदारांना जीवे मारण्याची धमकी दिली.
