। कर्जत । प्रतिनिधी ।
विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरी करणारी टोळी रायगड पोलिसांनी केली गजाआड केली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या दुचाकी चोरांनी चोरलेल्या नऊ दुचाकींचे गुन्हे उघडकीस आले आहे.
कर्जत बाजारपेठेतील जुनी नगरपरिषद कार्यालय येथील मोकळ्या जागेत लावलेली दुचाकी चोरीला गेली होती. शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने दुचाकीमालकाने 15 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवधरे, सो अलिबाग-रायगड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कर्जत पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी शोध सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस कॉन्स्टेबल समीर भोईर, स्वप्निल येरुणकर, केशव नागरगोजे, विठ्ठल घावस यांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, गुप्तहेर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी चोरांपर्यंत पोहचवून मुरबाड येथून या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या.
या दुचाकी चोरांमध्ये चार तरुण असून त्यातील एक मुख्य सूत्रधार हा मुरबाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी आहे. नरेश नारायण कराळे हा तरुण मुरबाड पोलिस ठाण्याच्या फरार आरोपीपैकी एक असून त्याच्यावर मुरबाड पोलीस ठाणे येथे तीन आणि शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीत एक असे चार गुन्हे दाखल आहेत. तसेच, या तरुणावर खुनाचा गुन्हादेखील दाखल आहे.
ठाणे जिल्ह्यातील पोलिसांच्या फरार यादीमध्ये आरोपी नरेश नारायण कराळे याला पकडण्यात आल्यानंतर दुचाकी चोरांचे रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रदीप चंद्रकांत कडू (रा. साळोख), अरविंद राजू स्वामी (रा.जांभिवली), सचिन भानुदास भगत (रा. कुंडलज) अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना कर्जत पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दुचाकी चोरांकडून कर्जत पोलिसांनी कर्जत पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. त्याचवेळी या चोरट्यांनी ठाणे जिल्ह्यातील आणखी सहा गुन्हे उघडकीस आणले असून किन्हवली, मुरबाड, बदलापूर कुलगाव, शिवाजीनगर अंबरनाथ, बदलापूर पूर्व येथील गुन्हे उघडकीस आणले आहेत.





