गोवंश चोरी करून कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील गोवंशीय जनावरांची चोरी करून त्यांची निर्घृणपणे कत्तल करणाऱ्या एका टोळीचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात जनावरे चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

22 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ममतापूर येथील एका बंद गोठ्याचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी शर्यतीचा बैल चोरून नेला होता. आपल्या बैलाची चोरी झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. व घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दामत आणि ममतापूर परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. उजेर हनिफ नजे (22), फुरकान परवेश नजे (20) दोघेही रा. दामत, कर्जत व मोहम्मद अरशद अली अहमद तांबोळी (22) रा. ममतापूर, कर्जत या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, पोलीस हवालदार सचिन वाघमारे, राजेभाऊ केकाण, आश्रुबा बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.

Exit mobile version