| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे पथकाने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रायगड जिल्ह्यातील चार आणि नवी मुंबईतील एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असून, चोरीस गेलेल्या सुमारे 4.78 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. रबीउलइस्लाम तामजुइस्लाम शेख (45) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने रायगड व नवी मुंबई परिसरात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर सोनू, आवेस, चिनीदादा व वृषभ धनराज जैन यांचा समावेश असल्याचे उघडकीस आले. या टोळीने नेरळ, खालापूर, पेण तसेच नवी मुंबई परिसरातील मोबाईल टॉवरमधून बॅटऱ्या चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून 144 बॅटऱ्या फोडून त्यामधील सुमारे 1800 किलो वजनाचे शिसे जप्त केले. तसेच, गुन्ह्यात वापरलेले वाहनही ताब्यात घेतले आहे..
बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
