। ठाणे । प्रतिनिधी ।
नौपाडा पोलिसांच्या हद्दीतील वामन शंकर मराठे ज्वेलर्स हे दुकान लुटणार्या पाच जणांच्या टोळीला 72 तासांत गजाआड करण्याची कामगिरी नौपाडा पोलिसांनी केली आहे. यावेळी, आरोपींकडून 28 लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना 21 डिसेंबर रोजी अटक केली असून त्यांचा पोलीस रिमांड मंजूर झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा पूर्वइतिहास पाहता त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थानमधील पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी 24 ते 35 या वयोगटातील आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 डिसेंबर रोजी 1.50 ते 4.30 वाजता अनोळखी व्यक्तींनी दुकानाच्या प्रवेशद्वाराचा कडी-कोयंडा तोडून आणि शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि 28 लाख 77 हजार 490 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्वेलर्स लुटणारी टोळी गजाआड
