गोल्डन मॅनकडून गुंडावर हल्ला
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा पोलीस ठाण्याचे हद्दीत गँगवॉरने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून, खुटारी येथील गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे याच्याकडून राजकुमार म्हात्रे याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गुंड राजकुमार म्हात्रेसह सूरज म्हात्रे हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अनिकेत म्हात्रे, प्रणित म्हात्रे, शैलेश म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, अनिश म्हात्रे, मोनीश म्हात्रे, किरण म्हात्रे, भावेश म्हात्रे, वीरेंद्र म्हात्रे, बंटी तुकाराम म्हात्रे (सर्व राहणार खटारी गाव) आणि निखिल भोईर (वेतोडे गाव) आणि इतर दोन ते तीन अनोळखी इसमांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील तक्रारदार सुरज म्हात्रे आणि राजकुमार म्हात्रे हे बैलांच्या संदर्भात चर्चा करत उभे होते. यावेळी आरोपी हे फॉर्च्यूनर कार, थार गाडी आणि काळया रंगाच्या मोटर कारमधून येऊन अनिकेत म्हात्रे याने राजकुमार म्हात्रे याला तू भाई झालास का असे बोलून जुन्या जागेच्या वादाच्या कारणावरून रिव्हॉल्व्हरने हवेत दोन राऊंड फायर केले. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या 13 आरोपी यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या हॉकी स्टिक, तलवार, लोखंडी रोड, लाकडी दांडके यांनी राजकुमार म्हात्रे याच्या डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि सूरज म्हात्रे हा सोडवण्यास गेला असता त्यालादेखील पाठीवर, हातावर, मारहाण करून शिवीगाळ केली आणि धमकी दिली. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला. यातील जखमींवर प्राचीन हेल्थकेअर ठाणा नाका, पनवेल येथे उपचार सुरू आहेत.
