| खोपोली | प्रतिनिधी |
रेल्वे सिग्नलसाठी वापरली जाणारी महागडी वायर रेल्वे वसाहतीजवळ अंधाराचा फायदा घेत चोरुन पोबारा केला होता. ती वायर पहाटे चार वाजण्याच्या मुंबईकडे विकण्यासाठी जात असताना रात्रगस्त घालणार्या पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ही घटना शुक्रवार, दि.2 सप्टेंबर रोजी घडली. खोपोली पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेश कदम, पोलिस अंमलदार प्रदीप खरात, स्वागत तांबे, दत्तात्रय नुलके हे रात्रगस्त घालत असताना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान पुणे हायवेरील युनिमाऊंट इमारतीच्या समोर एका लाल रंगाच्या अल्टो कार क्र-एमएच 03-एम-0136 मध्ये 3 जण होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांची कसून चौकशी केली असता रेल्वे सिग्नलसाठी वापरली जाणारी वायर मिळून आली. पोलिसांनी त्यांच्या जागीच मुसक्या आवळत अटक केली. याबाबत रेेल्वे पोलिसांनी खबर देताच आर.पी.एफ मुंबई डिव्हिजनच्या पोलीस उपनिरीक्षक कविता साहू यांनी खोपोली पोलीस ठाण्यात येऊन आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास सुरू आहे.