| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत असताना पनवेल वाहतूक शाखेने अमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये महत्त्वाची कारवाई केली आहे. अंमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक राकेश राजपूत, वाहतूक शाखा पनवेल शहर, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विना हेल्मेट वाहन तपासणी करत असताना व्हिस्पा कंपनीची स्कुटर क्रमांक 05 6183 संशयास्पदरीत्या थांबविण्यात आली. तपासणीदरम्यान सदर स्कुटरच्या डिक्कीतून सुमारे 25,000 रुपये किंमतीचा 29 ग्रॅम वजनाचा उग्र वास असलेला हायड्रो गांजा आढळून आला. या प्रकरणी पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कारवाईदरम्यान एकूण सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 29 ग्रॅम गांजा (25,000 रुपये), व्हिस्पा स्कुटर (75,000 रुपये) व आयफोन 14 प्रो (50,000 रुपये) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपी केतन गिरीश मालू (वय 22, रा. खांदा कॉलनी, पनवेल) यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात विहित वेळेत हजर करण्यात येत आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशाने करण्यात आली. या वेळी पोलीस नाईक राजपूत व पोलीस शिपाई बुट्टे यांनी सतर्कतेने काम करत शहरातील अमलीपदार्थ विक्रीविरोधात प्रभावी संदेश दिला आहे. पनवेल शहरात अमलीपदार्थांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
25 हजारांचा गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत
