गारंबी-नागशेत रस्त्याची दुरवस्था

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

मुरूड ते केळघर मार्गे रोहा या राज्य मार्गावरील नागशेत ते गारंबी या 2 किमी मार्गावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूकडील भाग देखील ढासळल्याने वाहनांना मार्ग काढणे धोकादायक ठरत असून अपघात घडत आहेत. मुसळधार पावसात या मार्गाची अवस्था आधिकच बिकट होऊन प्रवास करणे धोकादायक होईल, असे चित्र आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच उपाययोजना केली नाहीतर हा मार्ग वाहून जाण्याची दाट शक्यता असल्याचे मत परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. तसेच, पावसाळ्यात रोहा ते मुरूड हा मार्ग बंद पडण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.

या रस्त्यावर खड्डे पडले असले तरी अनेकजण जवळचा मार्ग असल्याने या मार्गाने प्रवास करतात. या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. नागशेतकडून गारंभीकडे जाणारा डोंगर कपारीतून नागमोडी वळणाचा उंचावर असणारा मार्ग आहे. नागशेत ते गारंबी हा मार्ग मुळातच अरुंद असून याला काही ठिकाणी साईडपट्टीच नाही. दोन वर्षांपासून या मार्गवरील डांबर उखडून खड्डे पडले असूनही कुणीही येथे लक्ष दिले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. सध्या रोज मोटार सायकलस्वारांचे अपघात घडत आहेत. रोज प्रवास करणाऱ्या मंडळींना कमालीचा त्रास होत असून पावसात रस्त्याची अवस्था आधिक भयानक होऊ शकेल, असे स्पष्ट दिसत आहे. रात्री तर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version