ग्रामपंचायतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील खांडा गावातील कचरा कुंडी तोडण्यात आली असून, ती तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आदेश नेरळ ग्रामपंचायतीकडून कोणालाही देण्यात आला नव्हता. त्यामुळे कचरा कुंडी तोडणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि त्या ठिकाणी नव्याने कचरा कुंडीही बांधून द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेरळ शहराचे उपाध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी दि.18 सप्टेंबर रोजी नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या खांडा गावात ममदापुर नेरळ स्टेशन रस्त्याच्या बाजूला असलेली कचरा कुंडी या भागातील एका माजी ग्रामपंचायत सदस्यांने कामगार घेऊन तोडली होती. त्याबाबत तात्काळ स्थानिक रहिवाशांनी विचारणा केल्यावर नवीन कचरा कुंडी बांधायची आहे असे उत्तर स्थानिक रहिवासी सुभाष नाईक यांना त्या माजी ग्रामपंचायत सदस्याने दिले होते. मात्र, त्यानंतर आजतागात कचरा कुंडी बांधून देण्यात आली नाही. मात्र त्याबाबत माहिती सुभाष नाईक यांनी काढली असता नेरळ ग्रामपंचायतीकडून सदर कचरा कुंडी तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नव्हती.
त्यामुळे सुभाष नाईक यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे दुसरे पत्र 18 सप्टेंबर रोजी दिले असून, ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधाची ठिकाणी कचरा कुंडी पुन्हा बांधून द्यावी आणि कचरा कुंडी तोडणार्या ग्रामपंचायत माजी सदस्यावर गुन्हा दाखल करून संबंधित कचरा कुंडी बांधण्यासाठी येणार खर्च पुन्हा वसूल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.