| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-आक्षी मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचा ढिगारा आहे. हा ढिगारा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना दिसू नये, म्हणून या कचऱ्यांवर कापडाचा पडदा लावण्यात आला आहे. या कांदळवनातील कचऱ्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने हा रस्ता कचऱ्याने भरला आहे. राणेंचे बुधवारी (दि. 8) आक्षीमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी कचऱ्यावर पडदा टाकण्याचे काम करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील रेवदंडा, नागाव, आक्षी ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ कायमच आहे. अलिबागहून रेवदंडा, आक्षी, नागावकडे जाणाऱ्या पर्यटकांना आक्षी पुलाजवळील रस्त्याच्या दूतर्फा असलेल्या कचऱ्याशी कायमच सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे. अनेक वेळा नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या कांदळवनात कचऱ्यांचा ढिगारा पडलेला असतानाही वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून कचऱ्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. परंतु, कार्यवाही दिसून आली नाही. मात्र, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे बुधवारी अलिबाग-आक्षी येथे दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमानिमित्त ते आक्षीमध्ये दुपारी तीन वाजता येणार आहेत. परंतु, आक्षी जवळील रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा त्यांना दिसू नये, म्हणून कचऱ्यावर कापडी पडदा लावण्याचे काम करण्यात आले आहे. मंत्र्यांना हा कचरा दिसू नये म्हणून करण्यात आलेल्या प्रकाराबाबत स्थानिकांकडून चर्चेला उधाण आले आहे.






