नेरळ-कल्याण रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य

। नेरळ । वार्ताहर ।

ममदापुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत नेरळ-कल्याण स्त्यावर मोठया प्रमाणावर कचर्‍याचे ढिग टाकण्यात येत आहेत. त्यामुळे नेरळ विद्या मंदिर शाळेत जाणारे विद्यार्थी यांना नाकावर रुमाल ठेवून जावे लागत आहे. मात्र, ममदापुर ग्रामपंचायत त्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या कचरा टाकणार्‍यांवर काही कारवाई करीत नाही. त्यामुळे या भागात दोन ठिकाणी नवीन कचरा डेपो उघडले गेले आहेत.

ममदापुर ग्रामपंचायत मधील नेरळ विद्या मंदिर परिसर हा नव्याने वाढत आहे. त्या भागात ममदापुर ग्रामपंचायत कडून केवळ आठवड्यातून एकदाच घंटागाडी कचरा उचलण्यासाठी जाते आणि त्यामुळे त्या भागात जागोजागी कचरा पडून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रामुख्याने नेरळ-कल्याण रस्त्याच्या बाजूला दोन ठिकाणी प्लास्टिक पिशवीमधून आणलेला कचरा रस्त्याच्या बाजूला टाकतात. त्यामुळे ममदापुर ग्रामपंचायतीमध्ये नवीन कचरा डेपो निर्माण झाले आहेत व परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने नव्याने घंटागाडी खरेदी करून नेरळ-कल्याण रस्त्यावर टाकण्यात येत असलेला कचरा दररोज उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच रस्त्याने दररोज किमान दोन हजार विद्यार्थी हे नेरळ विद्या मंदिर शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे ममदापुर ग्रामपंचायतने रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेला कचरा उचलण्यात यावा तसेच रस्त्यावर बेकायदा कचरा टाकणार्‍या ग्रामस्थांनावर ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अशी मागणी रस्त्याने जाणारे रहिवाशी करीत असतात.

Exit mobile version