किल्ले रायगडावर कचर्‍याचा ढीग

राज्याभिषेक सोहळ्यानंतरची साफसफाई केवळ दिखावा

। महाड । प्रतिनिधी ।

ऐतिहासिक किल्ले रायगडावर 6 जून आणि 19 जून रोजी तारीख आणि तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळे पार पडल्यानंतर गडावर जमा झालेला कचरा सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेमार्फत संग्रहित केला होता मात्र हा कचरा रायगड रोप वे अप्पर स्टेशनच्या जवळच पडून आहे. या कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

किल्ले रायगडावर 6 जून रोजी तारखेप्रमाणे आणि 19 – 20 जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो शिवभक्तांनी हजेरी लावली होती. गडावर आलेल्या शिवभक्तांच्या विविध सुविधा किल्ले रायगडावर पुरवण्यासाठी प्रशासनामार्फत जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. शिवभक्तांना लागणारे पिण्याचे पाणी पॅकिंग बाटलीद्वारे पुरवण्यात आले होते. हे पाणी प्यायल्यानंतर मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या गडावर पडून होत्या. त्याचप्रमाणे गडावर भोजन व्यवस्था देखील करण्यात आली होती. हे भोजन वाटप करण्याकरता प्लास्टिकच्या पत्रावळ्या देण्यात आल्या होत्या. सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेमार्फत हा कचरा दुसर्‍या दिवशी उचलण्यात आला. गडावर मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली. प्लास्टिकच्या बॅगमधून हा कचरा रायगड रोपवे अप्पर स्टेशन जवळ आणून टाकण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळे होऊन आज जवळपास अनेक दिवस उलटून गेले आहे मात्र अद्याप हा कचरा पडून राहिल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. प्लास्टिक कचरा असल्याने गडावरील पर्यावरणात देखील धोका निर्माण होत आहे.

रायगड किल्ला पाहण्यासाठी आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गडावर दरवर्षी लाखो शिवभक्त आणि पर्यटक भेट देत असतात. गडाची देखभाल दुरुस्ती पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येत असली तरी सध्या गडावरील संवर्धनाचे काम रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे गडावर रायगड प्राधिकरणाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र एकीकडे संवर्धन होत असताना दुसरीकडे पर्यटक आणि शिवप्रेमी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बाटल्यांचा वापर गडावर वाढला आहे. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा आणि इतर कार्यक्रमानंतर गडावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जमा होत आहे. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष केले आहे. नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर होती. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रायगड रोपवे अप्पर स्टेशन येथे संग्रहित केलेला कचरा आजही उचलण्यात आलेला नाही.

गडावर आलेल्या शिवभक्तांसाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता याबाबतची सर्व जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेकडे होती. याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.

ज्ञानोबा बाणापुरे,
उपविभागीय अधिकारी महाड

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर साफसफाई झालेली आहे मात्र संग्रहित केलेला कचरा विलेवाट न झाल्याने रायगड रोपवे जवळ तसाच पडून आहे. हा कचरा गडाखाली नेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने स्वीकारून त्याची विल्हेवाट लावली जावी.

हर्षवर्धन पाटील
शिवप्रेमी, पुणे
Exit mobile version