रायगडापर्यंत ये-जा करण्याची सुविधा; शिवभक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक
| महाड | उदय सावंत |
किल्ले रायगडावर दिनांक 6 आणि 9 जून अशा दोन दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले होते. यादरम्यान, वाहतूक विभाग आणि एसटी महामंडळाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावेळी टाळता येणे शक्य झाले.
ऐतिहासिक किल्ले रायगडावर 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. तर, तिथीप्रमाणे 9 जून रोजी राज्याभिषेक साजरा करण्यात आला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले होते. दरवर्षी कोंझर ते रायगड दरम्यान अरूंद रस्त्यामुळे जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शिवभक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वाहतूक विभाग आणि एसटी महामंडळाने या ठिकाणी दमदार कामगिरी केली आहे. कोंझर या ठिकाणी शिवभक्तांच्या गाड्या थांबवून त्याच ठिकाणी पार्किंग करून एसटीने किल्ले रायगडापर्यंत ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध केली गेली. परिणामी या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य झाले आहे. एसटीच्या सलग फेऱ्यांमुळे पर्यटक आणि शिवभक्तांना ये-जा करणे सुलभ झाले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा आणि एसटी महामंडळाने शिवभक्तांना किल्ले रायगडापर्यंत नेणे आणि तेथून पुन्हा वाहन तळाजवळ आणणे ही जबाबदारी मोठ्या कुशलतेने सांभाळली.
शिवप्रेमींमध्ये समाधान
5 जून पासूनच एसटी महामंडळाने महाड आगाराच्या सर्व गाड्या वाहन तळाजवळ उभ्या केल्या. या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना वाहन तळामध्ये वाहन उभे केल्यानंतर तेथून किल्ले रायगडापर्यंत नेण्यासाठी सलग फेऱ्यांचे आयोजन महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कोंझर आणि पाचाड हेलिपॅड याठिकाणाहून ही व्यवस्था करण्यात आली होती. 6 जून रोजी 1 हजार 546 फेऱ्यांमधून जवळपास 73 हजार 455 प्रवाशांची तर 9 जून रोजी 595 फेऱ्यांमध्ये 17 हजार 850 प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिली. या नियोजनबद्ध सुविधांमुळे शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
किल्ले रायगडावर यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये एसटी महामंडळाच्या सर्वच अधिकार व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दिवस-रात्र मेहनत घेऊन शिवभक्तांची सेवा केली.
रितेश फुलपगारे,
आगार प्रमुख, महाड