| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नैनेश दळवी आणि निलिकेश दळवी या बंधूंनी शेतकऱ्यांना मदतगार ठरेल असे भात कापणी व भात मळणी यंत्र विकसित केले आहे. कोरिया देशातून बंद पडलेली यंत्रसामग्री खरेदी करून त्यापासून हे यंत्र विकसित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे यंत्र फायदेशीर ठरत आहे.
भाताची शेती करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अवजारे महत्वाची ठरत आहेत. कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे वदप गावातील लक्ष्मण दळवी यांच्या पुत्रांकडून शेतकऱ्यांना मदतगार ठरतील अशी यंत्रे बनविण्यात आली आहेत. नैनेश आणि निलिकेश दळवी यांनी कोरिया देशातून भाताची कापणी व मळणी करणारे बंद अवस्थेत असलेली यंत्रसामग्री खरेदी केली.त्या यंत्राला काही किरकोळ दुरुस्त्या करून दळवी बंधूंनी आपल्या देशात मध्यम दर्जाचे कापणीचे यंत्र बनविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतगार ठरेल असे यंत्र उपलब्ध झाले आहे. एकाच ठिकाणी भाताची कापणी आणि नंतर लगेच मळणी हा या यंत्राचा प्रमुख फायदा आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना भातापासून मिळणारा पेंढा देखील पूर्णपणे मिळतो. त्याचबरोबर एका दिवसात तीन एकर जमिनीमध्ये भाताच्या पिकाची कापणी आणि मळणी हे यंत्र करून देत आहे.