| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) योजनेअंतर्गत फळबाग लागवड, फुलशेती आणि बांबू लागवडीसाठी 100% अनुदान उपलब्ध आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी सुधागड कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील हवामान फळबाग लागवड आणि बांबू लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी स्थानिक शेतकरी बांधवांनी फळबाग लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. जून महिन्यात लागवड केलेल्या कलमांची वाढ जोमदार होते. कृषी विभागामार्फत आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिकू, आवळा, चिंच, जांभूळ, अंजीर यासारख्या फळपिकांची लागवड करता येते. मोगरा, गुलाब, सोनचाफा, निशिगंध, पाणपिंपरी, तुती/रेशीम यासारख्या फुलपिकांची लागवड करता येते. तसेच, बांबू, हादगा, जेट्रोफा, साग, चंदन, गिरिपुष्प, शिंदी यासारख्या वनपिकांची लागवड देखील करता येते.
नरेगा अंतर्गत शेतकरी बांधवांना 5 गुंठे ते 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड करता येते. प्रथम वर्षी 60%, द्वितीय वर्षी 20% आणि तृतीय वर्षी 20% याप्रमाणे अनुदान वितरित केले जाते. त्यामुळे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांनी ग्रामस्तरीय सहाय्यक कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. असे आवाहन सुधागड कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.