ने-आण करण्यासाठी स्कूल बसचा वापर
| पेण | प्रतिनिधी |
जेएसडब्ल्यू कंपनी नियमांचा काटेकोर पालन करतात, असे कंपनीकडून ठणकावून सांगण्यात येते. परंतु, कंपनी बरोबरच सहठेकेदार म्हणून काम करणाऱ्या ठेकेदाराची माणसं अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे समोर येत आहे. सकाळच्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारावर कंपनीचे सर्व नियम डावळून खुलेआम कामगारांची अवैध वाहतूक होत आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जेएसडब्लू कंपनीत नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. परंतु, कंपनीच्या ठेकेदारांकडून या नियमांचे पालन केले जात आहे का, याची खातरजमा कंपनीकडून केली जात नसल्याचे निदर्शानास येत आहे. ठेकेदारांच्या कामगारांची ज्या बसमधून वाहतूक होते त्या बस चालकांजवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नाहीत. तसेच, काही बसेस तर कालबाह्य झालेल्या आहेत. साधारणतः या बसेसमध्ये 45 ते 50 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. परंतु, या बसमध्ये 60 ते 70 कामगार कोंबले जातात. भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जिम्मेदार कोण? बस चालक की बस मालक, असा संतप्त सवाल जनसामान्यांतून उपस्थित होत आहे.
‘कृषीवल’च्या प्रतिनिधीने एका संताजी नावाच्या बस चालकाला याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, आमच्याकडे कागदपत्र नाहीत हे आम्हाला माहीत आहे. आमचा मालक त्यासाठी समर्थ आहे. कंपनी काय ते बघून घेईल. असे उद्धटपणे त्यांच्याकडून उत्तर देण्यात आले. त्याचबरोबर एक स्कूल बस देखील कामगारांची ने-आण करण्यासाठी वापरली जात आहे. पेण उपप्रादेशिक कार्यालयातून जेव्हा त्या स्कूल बसची माहिती घेतली तेव्हा मालकाचे नाव महेंद्र गजानन म्हात्रे असे समजले. याचाच अर्थ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा देखील स्कूल बस बाबतचा धोरण उदासिन आहे.
एकंदरीत अवैधरित्या व त्यात क्षमतेपेक्षा जास्तीची वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीच्या सुरक्षारक्षकाच्या समोरूनच खुलेआम कामगारांची वाहतूक केली जात आहे. याबाबत जेएसडब्ल्यू कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्तर देण्याची टाळाटाळ करण्यात आली. याचाच अर्थ जेएसडब्ल्यू प्रशासन देखील या अवैध वाहतूकीला तेवढीच जबाबदार आहे.
स्कूल बसने कामगारांची ने-आण करत असतील तर ते चुकीचे आहे. आम्ही त्याबाबत माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करू.
महेश देवकाते,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी