| पुणे | प्रतिनिधी |
पुण्याहून देवदर्शनासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्सला सोलापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्समध्ये जवळपास 35 भाविक असल्याचा अंदाज आहे. तर 15 ते 20 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची भीषणता पाहता मृताचा आकडा आणखी वाढू शकतो. सोलापूरहून अक्कलकोटला जात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला जोरात धडक दिली. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगात होती. बसने ट्रकला धडक दिल्यामुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले. पुण्यावरून अक्कलकोट कडे देवदर्शनला जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसही तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले.