आमदाराच्या गावातील कचर्‍याचा ढीग

। अलिबाग । प्रतिनिधी ।

विकासाच्या बाता मारणार्‍या आमदारांच्या गावात कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अनेकवेळा स्थानिकांनी तक्रारी करूनही हा प्रश्‍न सोडविण्यास आमदार महेंद्र दळवी उदासीन ठरल्याचे बोलले जात आहे. थळमधील कचरा खाडीत टाकला जात आहे. त्याचा नाहक त्रास मासेमारी करणार्‍यांना होत आहे.

अलिबाग, मुरूड, रोहा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केल्याचे फलक चौका-चौकात लावण्यात आले. काही ठिकाणी मोठा दिखावा करीत कामांचे भूमीपूजन सहा महिन्यांपूर्वी केले. परंतु, प्रत्यक्षात ही कामे आजही कागदावरच असल्याचे चित्र आहे. आमदार दळवी थळ गावातील रहिवासी आहेत. परंतु, त्यांच्याच गावातील अनेक वाड्या पाण्याविना असल्याचे बोलले जात आहे. पाण्यासाठी येथील स्थानिकांना वणवण करावी लागत आहे. ज्या गावात तीन- तीन पाण्याच्या टाक्या बांधल्या. त्या टाक्या आजही कोरड्या आहेत, असे सांगण्यात आले आहे.

आमदारांच्या गावातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा भूमी नसल्याने तो कचरा नवगाव, थळ गावांना जोडणार्‍या पुलाच्या मागील भागात खाडीमध्ये टाकला जातो. या गावात मोठ्या प्रमाणात कोळी समाज आहे. मासेमारी हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. परंतु, खाडीमध्ये कचरा टाकला जात असल्याने मासेमारी करण्यास मच्छिमारांना प्रचंड त्रास होत आहे. खाडीत टाकलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असताना, खाडीतील मासळी मिळेनासी झाली आहे. त्याचा छोट्या मच्छिमारांना फटका बसत आहे.

आमदारांच्या गावातील कचराभूमीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तरीदेखील आमदार या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी ओरड स्थानिकांकडून केली जात आहे. ग्रामपंचायतीलादेखील अनेक वेळा सांगण्यात आले आहे, तरीसुद्धा त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

थळ गावातील कचरा खारटात टाकला जातो. त्यामुळे मासेमारीवर त्याचा परिणाम होत आहे. अनेकवेळा ग्रामपंचायत व आमदारांकडे काही ग्रामस्थांनी साकडे घातले आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

स्थानिक ग्रामस्थ,
थळ (नाव न सांगण्याच्या अटीवरून)

Exit mobile version