आमदारांची पाठ असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
| अलिबाग | प्रतिनिधी |
आमदार दळवी यांनी सध्या दिलीप भोईर यांना जवळ केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजा केणी यांना उमेदवारी शिंदे गटातून मिळणार की नाही, असा प्रश्न जनमानसातून उमटत आहे. राजा केणी यांचे शिंदे गटात राजकीय भवितव्य धोक्यात आल्याची चर्चा सुरु आहे. त्यात आदिती तटकरे पालकमंत्री झाल्यावर ते राष्ट्रवादीतदेखील जातील, अशीही चर्चा आहे. आमदार दळवी यांचे अगदी जवळचे असणारे राजा केणी सध्या आमदारांपासून दूरच असल्याची चर्चा जोर धरत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत कलह हळूहळू उघड होत असल्याचे बोलले जात आहे.
आमदार दळवी आणि दिलीप भोईर हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू होते. दळवी यांचा कार्यकर्ता झिराडमध्ये दिलीप भोईर यांना डोईजड ठरत होता. दळवी यांच्या मदतीने तो भोईर यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करीत होता. दिलीप भोईर भाजपमध्ये असताना अलिबाग-रोहा रस्त्यावरून श्रेयवाद झाला. या वादावरून भाजप आणि शिंदे गटात चांगलेच राजकारण तापले होते. आमदारकीच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात जात दिलीप भोईर यांनी दळवी यांच्याविरोधात दंड थोपटले होते. दरम्यान, भाजपने दिलीप भोईर यांच्याविरोधात कारवाई करीत पक्षातून हकालपट्टी केली. भाजपमधून हकालपट्टी झाल्यावर दिलीप भोईर यांनी अखेर शिंदे गटात पक्ष प्रवेश करून आमदार दळवी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. दिलीप भोईर यांच्या शिंदे गटातील आगमनाने राजा केणी यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली. आमदारांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात राजा केणी दूरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अंतर्गत कलह असल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची हालचाल प्रशासनाकडून सुरू झाली आहे. शिंदे गटातील जिल्हा प्रमुख, आमदार दळवी यांचे अगदी जवळचे म्हणून ओळखळे जाणारे राजा केणी सध्या उमेदवारीचे बाशिंग बांधून उभे आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते उमेदवारीची जाहिरात करीत आहेत. दळवी यांना विश्वासात न घेता ते प्रचार करीत असल्याची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसताना, राजा केणी यांच्याकडून उमेदवारीचा प्रचार सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रकारामुळे ते एकला चलो रे असे चित्र दिसून येत आहे. राजा केणी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आदिती तटकरे पालकमंत्री झाल्यावर ते राष्ट्रवादी जाणार असल्याचेदेखील बोलले जात आहे. त्यामुळे राजा केणी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पालकमंत्रीपदानंतरच हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.
केणीच्या बंडखोरीने महायुतीत गोंधळ
राजा केणी यांनी बंडखोरी करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीत धुसफूस सुरू आहे. आतापासून आपणच उमेदवार अशा बतावण्या ते वेगवेगळ्या माध्यमातून मारत सुटले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजप, राष्ट्रवादी सोबत आले नाही, तर आम्ही एकटे लढू, असा दिखावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र भाजप, राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय शिंदे गटाला पर्याय नाही, अशीही चर्चा सुरु आहे.





