| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भेकर जातीच्या संरक्षित वन्यजीव प्राण्याचे मांस बाळगल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जयेंद्र भगत यांच्याविरोधात अलिबाग व मांडवा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत घरातील स्वयंपाकघरातील फ्रिजमध्ये मांस आढळून आले. याबाबत वन विभागाने शोध सुुरू केला आहे. भगत यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भेकर मांसप्रकरण जयेंद्र भगत यांना भोवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र भगत यांच्या घरात भेकर या संरक्षित वन्य प्राण्याचे मांस असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. मांडव्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, अलिबाग पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे, पोलीस हवालदार प्रदीप देशमुख, जितेंद्र चवरकर, पोलीस शिपाई गणेश पारधी, सागर गोळे या पथकाने गुरुवारी (दि.23) सायंकाळी जयेंद्र भगत यांच्या घरावर छापा टाकला. घराची झाडाझडती सुरु करण्यात आली. किचनमधील फ्रिजमध्ये एक किलो वजनाचे भेकर जातीच्या संरक्षित वन्य प्राण्याचे मांस आढळून आले. तो मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमाल अलिबागमधील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
जयेंद्र भगत यांच्या घरात भेकरचे मांस सापडल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, भेकर जातीचे प्राणी फणसाड परिसरात आहेत. त्याठिकाणी भेकरची शिकार कशी केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. फणसाड परिसरात वन विभागामार्फत सुरक्षा राखली जाते. तरीदेखील त्या परिसरात भेकरची शिकार झाल्याने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी काय करीत होते, अशा अनेक प्रकारच्या चर्चेला उत आला आहे. याबाबत वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
भेकरप्रकरण महाळुंगे कनेक्शन?
फणसाड परिसरातील महाळुंगे परिसराती काही धनदांडग्यांची फार्महाऊस आहेत. यातील एका व्यक्तीकडे विनापरवाना बंदूक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भेकर मांस प्रकरण महालुंगे कनेक्शन असल्याची चर्चा आहे. यात आणखी कितीजण सहभागी आहेत, हे वन विभागाच्या तपासानंतर निष्पन्न होईल. वन विभाग काय तपास करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
भेकर मांसप्रकरणी जयेंद्र भगत यांची वन विभागामार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत भगत यांच्यावर चौकशीचा फेरा सुरु झाला आहे. शुक्रवारी चार तासांपासून वन विभागमार्फत चौकशी सुरु केली असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.







