आदिवासी बांधवांना कुडाच्या घरांचा आधार

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
निसर्गात राहून खर्‍या अर्थाने निसर्गाचे संवर्धन करणारे आदिवासी लोक नैसर्गिक संसाधनांचा वापर केलेल्या कुडाच्या घरात राहत आहेत. पावसाळ्यात आपला निवारा टिकविण्यासाठी हे आदिवासी आपल्या कच्च्या कुडाच्या घरांची डागडुजी व नव्याने बांधणी पूर्ण करतात. जिल्ह्यातील विविध आदिवासी वाड्यापाड्यांवर आता ही कुडाची घरे बनून तयार झाली आहेत. तर काही फार्म हाऊस व कृषिपर्यटन केंद्रावर देखील अशा प्रकारची कुडाची घरे बनवली आहेत. ही घरे पर्यटकांना देखील आकृष्ट करतात.


कुडाचे घर बांधण्यासाठी सर्वात महत्वाची साधनसामग्री म्हणजे कारवीच्या काठ्या, माती व शेण जंगलातून कारवीच्या लांब काठ्या तोडून आणल्या जातात. मग दगडी व मातीच्या पायावर कारवीच्या काठ्या उभ्या करुन बांधल्या जातात. त्यावर मातीचा आणि शेणाचा मुलामा दिला जातो. बहुतांश वेळा घरातील आदिवासी महिलाच हे काम करतात. या कामासाठी कुशल हातांची व अनुभवाची गरज असते. मात्र बनविण्यास वेळही खुप लागतो. घराच्या मध्यावर व बाजुने असलेल्या लाकडी खांबांवर लाकडाचे आडवे खांब टाकुन त्यावर कौले किंवा ढापे रचले जातात. आतील जमीन चांगली चोपून शेणाने सारवली जाते. बाहेर छानसी पडवी काढली जाते. कि झाले कुडाचे कौलारू घर तयार. कधी कधी भिंती विटांच्या उभारून त्याला मातीचा लेप चढवला जातो किंवा तशाच ठवेल्या जातात. जीवसृष्टीतल्या विघटक घटकांप्रमाणेच काही काळाने या कुडाच्या म्हणजेच कारवीची शेण व माती उभारुन केलेली भिंती कुजातात. आदिवासींच्या घराच्या भिंती कुजल्या की त्या काढल्या जातात. त्या भिंतींचे उत्तम खत होते, त्याला लागलेले शेण आणि माती जंगलातील किंवा परसातील रोपांचे पोषण करते. काही काळाने हीच रोपे पुन्हा हा आदिवासी समाज आपल्या भिंती बांधायला वापरतो. हे चक्र जणू काही निसर्गाच्या चक्राप्रमाणे अविरत सुरु राहते. घर आणि घराच्या भिंती बनविण्यासाठी लागणारा खर्च म्हणजे जंगलात जाऊन कारवी किंवा बांबू आणून तो विणायला जाणारा वेळ व मेहनत. आर्थिक खर्च तसा काहीच नसतो. असे कुडाचे घर बांधायला लागणारे लाकूड, झुडपे आणि माती सर्वच्या सर्व नैसर्गीक संसाधने हि पुढच्या पिढीला सहज उपलब्ध व्हावे म्हणून आदिवासी बांधव जंगल राखतात. आदिवासी समाजाचे पारंपरिक घर बांधणे, त्याची डागडुजी करणे हे तेथील जीवसृष्टीचा र्‍हास करीत नाही, उलट त्यास फायदेशीर व उपयुक्त असते. या घराला सर्व सामान्यांच्या सिमेंट विटांच्या घरांप्रमाणे आर्थिक किंमत अजिबात नसते, पण या घराचे पर्यावरणाशी असलेले अतुट आणि कधीही न तुटणारे नाते हे अमुल्य असते. हातावर पोट घेवून फिरणार्‍या या आदिवासी बांधवांना उन, वारा आणि पाऊस या पासून थोडा बचाव करण्याचा आधार हे कुडाचे घर देते. अशा सामान्यातील असामान्य गुण असलेल्या कुडाच्या घराशी आदिवासी बांधवांची नाळ अजूनही जुळलेला आहे. पारंपारीक स्वरुपात हस्तांतरीत झालेली हि घरबांधणीची कला कुठल्याही इंजिनिअर पेक्षा कमी नक्किच नाही.

कुडाच्या घरांचा सहारा
साजे आदिवासी वाडीवरील एकनाथ जाधव या आदिवासी बांधवाने सांगितले की. जंगलात कारवी सहज उपलब्ध आहे. सध्या पावसाळा सुरु झाल्याने अनेक जण आपली कुडाच्या घरांची डागडूजी करत आहे. हे कुडाचे घर अनके वर्ष टिकते. मात्र ऊन, वारा, पाणी यामुळे कालांतराने ते कुजते. आणि पुन्हा नव्याने त्याची डागडुजी करावी लागते. आता अनेक लोक विटांच्या कच्च्या घरात राहत आहेत. परंतू तरीही काहींना गरिबीमुळे कुडांच्या घरांशिवाय पर्याय नाही.

वरदान आणि शाप
कारवीच्या काठ्यांना माती व शेण थापून तयार केलेल्या भिंती आणि व कौलारू छप्पर घरात थंडावा आणते. उन्हाळ्यात तर हे कुडाचे घर वरदानच ठरते. मात्र मोठा पाऊस वादळवारा आल्यास या भिंती उन्मळून पडण्याचा धोका असतो. तसेच या तकलादू भिंती सुरक्षित नसतात. कोणीही तोडून घरात प्रवेश करु शकतो. त्यामूळेच आदिवासींना पक्की घरे मिळणे आवश्यक आहे. काही इको व ऍग्री टुरिझमवाले तर अशा प्रकारची कारवीची म्हणजेच कुडाची घरे खास बनवुन शहरातील लोकांना आकृष्ट करत आहेत. अनेकजण पैसे खर्च करुन या घरांमध्ये राहणे पसंत करतात. असे सुधागड तालुक्यातील इको आर्किटेक्ट तुषार केळकर यांनी सांगितले.

घरकुलचा लाभ नाही
गरीब, उपेक्षित, वंचित व गरजवंतांच्या डोक्यावर छत असावे म्हणजेच त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी विविध घरकुल योजना शासनाकडून राबिवल्या जातात. मात्र या घरकुल योजनांचा लाभ प्रत्यक्षात किती गरजवंतांपर्यंत पोहचतो हा संशोधनाचा मुद्दा आहे. असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्ली संलग्न चे कोकण संघटक रमेश पवार यांनी सांगितले.

Exit mobile version