विद्यार्थी, चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल
| सुधागड-पाली | वार्ताहर |
मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि.19) पाली-वाकण-खोपोली राज्य महामार्गावरील अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी भरले होते. तसेच, दापोडे गावाजवळ अंबा नदीचे पाणी रस्त्यावर आले होते. त्याचबरोबर भेरव येथील अंबा नदी पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच, नांदगाव येथील सरस्वती नदी पुल देखील पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी कामासाठी निघालेले चाकरमानी, प्रवासी तसेच विद्यार्थी यांचे हाल झाले होते.
सतत सुरु असलेल्या पावसामुळे पालीतील अंबा नदीवरील उन्हेरे व पाली जवळ अंबा नदीची पातळी वाढली असल्याकारणाने पुलाच्या दोन्ही बाजूस मुख्य रस्त्यावर पाणी भरले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरेकेटींगच्या सहाय्याने बंद करण्यात आली व योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला. त्याचप्रमाणे खुरावले फाटा येथील भेरव गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील पुलावर देखील पाणी भरल्याने हा पुल वाहतुकी करिता बंद करण्यात आला. तसेच, सरस्वती नदीची पातळी वाढल्यामुळे नांदगाव येथील नुकताच झालेल्या पुलावरून देखील पाणी गेले. त्यामुळे पाली रवाळजे मार्गावर तेथील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली.
नवा पूल उपयोग शून्य
अंबा नदीवर नुकताच उंच व रुंद असा मोठा पूल बांधण्यात आला आहे. या आधी अंबा नदीवरील जुना पूल हा अरुंद व उंचीने छोटा होता. तसेच, क्षमता देखील कमी होती. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहतूक ठप्प होत होती. नवीन रुंद व उंच पूल बांधल्यामुळे ही समस्या संपुष्ठात येऊन पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला व प्रवाशांना होती. मात्र, नव्या पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता हा खाली असल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणी साचते. परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होत आहे. एमएसआरडीसी प्रशासनाने या दोन्ही बाजूला मोरी टाकणे किंवा उंच रस्ता करणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्यामुळे हकनाक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अंंबा नदीवर नव्याने मोठा व उंच पूल बांधण्यात आला. मात्र, पावसाळ्यात पुलावरून पाणी जात नसले तरी पूलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावरून नदीचे पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद होतो. त्यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
संदीप दळवी,
पाली