अभियंत्यांच्या अति हुशारीमुळे चढउताराचा रस्ता
| महाड | उदय सावंत |
किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतानाच सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी नगर भवन नेवाळी ते किल्ले रायगड हा मार्ग काढण्यात आला. मात्र, हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली.
किल्ले रायगडकडे जाण्यासाठी महाड रायगड हा 24 किमी चा रस्ता अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे आता नव्याने माणगाव निजामपूर किल्ले रायगड आणि महाड रायगड मार्गाच्या खर्डी गावापासून नेवाळी हिरकणीवाडी ते रायगड असा एक नवा मार्ग सुरू करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी या मार्गाचे काम झाले त्याच वेळेस मार्गाची अवस्था बघून स्थानिक नागरिकांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. नगर भवन पासून नेवाळीपर्यंत असलेल्या डोंगरावर सरळ चढ आणि अरुंद वळणे देण्यात आली आहेत. यामुळे या मार्गावर मोठ्या बसेस जाणे शक्यच नाही. शिवाय छोट्या कार, मालवाहतुकीची वाहने देखील नेताना चालकाची दमछाक होत आहे. ही अवस्था पाहून स्थानिक नागरिकांनी देखील या मार्गावरून वाहनांची वाहतूक करणे अपघाताचा धोका म्हणून टाळले. याबाबत रस्त्याची पाहणी करून सुधारणा करण्याची मागणी देखील करण्यात आली.
महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांनी या मार्गाची निर्मिती करताना या सगळ्या बाबी का तपासल्या नाहीत याबाबत देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. नेवाळी गावाच्या खालील बाजूला असलेल्या घाट मार्गावर तीव्र वळण आणि उतार ठेवण्यात आला आहे. याठिकाणी आता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्ता रुंद करण्याचे काम सुरू केल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गटार आणि मोऱ्यांची कामे देखील निकृष्ट पद्धतीची झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी या तीव्र उतारा ऐवजी अन्य मार्गाचा पर्याय दिला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ओव्हर स्मार्ट अभियंत्यांमुळे हा मार्ग रुंद झालेला असला तरी भविष्यात देखील त्रासदायक ठरणार आहे.
नेवाळी गावापासून पुढे हा रस्ता जोडण्यासाठी आम्ही पर्याय दिला होता. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी ऐकले नाही म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे.
यशवंत आखाडे,
स्थानिक नागरिक