श्रीवर्धनमध्ये कचरा प्रश्‍न पेटला

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
नगरपरिषदेचे गायगोठण परिसरात कचरा साठवणूक केंद्र असुन जमा झालेल्या घनकचर्‍यातुन नगरपरिषद व्यवस्थापना मार्फत खतनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होता. काही महिन्यांपूर्वी प्रकल्प बंद पडल्यामुळे गायगोठण परिसराला कचरा साठवणूक केंद्राचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे या कचर्‍या संदर्भात लवकरच तोडगा काढावा यासाठी निवेदन देण्यात आले. घनकचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प बंद झाल्यापासून गायगोठण परिसरात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरल्यामुळे या परिसरात डास, माशांचा उपद्रव वाढला असुन घाणीमधे खाद्याच्या शोधात इतर पक्षी येतात. गायगोठण येथे स्थानिकांच्या विहिरी असुन त्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो. परंतु, पक्षी खाद्याच्या शोधात आल्यानंतर विहिरीच्या कठड्यावर बसतात व तिथेच विष्ठा टाकल्यामुळे त्या पाण्याचा स्थानिकांना काही वापर करता येत नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कचरा साठवणूक केंद्रात फक्त कचरा साठवण्याचे काम सुरू आहे. कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. कचरा गाडी पुर्ण क्षमतेनी भरलेली असुन सुद्धा गाडी वर पिशव्या ठेवल्या जातात. कचरा गाडी खड्डयातुन गेली की कचर्‍याच्या पिशव्या खाली पडतात. वारंवार तक्रार करुन काही दखल घेतली जात नसल्यामुळे गायगोठण येथील स्थानिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी विराज लबडे व नगराध्यक्ष फैसल हुर्जुक यांची भेट घेऊन कचरा संदर्भात लवकर तोडगा काढावा या बाबतीत चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी गटनेते अनंत गुरव, माजी आरोग्य सभापती/नगरसेवक किरण केळस्कर हे उपस्थित होते.

Exit mobile version