655 ग्रामपंचायतींना घंटागाडीची प्रतीक्षा; 809 पैकी 154 ग्रामपंचायतींकडेच घंटागाड्या
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील घराघरातून कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची संकल्पना पुढे आली होती. नागरीवस्तीमधील कचराकुंड्यांना हद्दपार करणे हा त्यातील प्रमुख उद्देश होता. दारात येऊन कर्मचारी कचरा घेऊन जाणार असल्याने नागरिकांच्या डोक्याचा ताप कमी झाला होता. त्यामुळे नागरिक या संकल्पनेल चांगलाच प्रतिसाद देत आहेत. मात्र यातील खरे चित्र अतिशय भयाण असल्याचे दिसते. जिल्ह्यातील 809 पैकी फक्त 154 ग्रामपंचायतींकडे घंटागाडी आहे, तर 655 ग्रामपंचायतींकडे घंटा पण नाही आणि गाडी देखील नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील मोजक्याच ग्रामपंचायतीमधील 207 घंटागाड्यांच्या माध्यमातून तेथील कचरा उचलला जात आहे. त्यामुळे 20 लाखांहून अधिक लोकसंख्या असणार्या ग्रामीण भागातील घंटागाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. रायगड जिल्ह्यामध्ये उद्योगिकरण वाढत असल्याने नागरिकांची संख्या असल्याने नागरी वस्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराला तसेच प्रकल्पाच्या शेजारी असणार्या गावांमध्ये हे नागरीकरण अलिकडे वेगाने वाढल्याचे दिसते. नागरीकरण वाढल्याने तेथील उपलब्ध असणार्या सोयी-सुविधांवर त्याचा ताण येत आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शौचालय, दिवाबत्ती अशा सुविधा अपुर्या पडत आहेत. जिल्ह्यात विविध माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
रायगड असणार्या 809 ग्रामपंचायतींपैकी 154 ग्रामपंचायतींमध्ये घंटागाडीची व्यवस्था आहे, तर 655 ग्रामपंचायींकडे घंटागाडीची व्यवस्था नाही. म्हसळा, पोलादपूर आणि तळा या ग्रामपंचातींकडे घंटागाडी नसल्याचे पाणी व स्वच्छता विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. 29 ग्रामपंचायतींनी घंटागाडी खरेदीची तरतूद केली आहे. तर, उर्वरित 780 ग्रामपंचायतींनी खरेदीच तरतूद केली नाही.
अलिबाग तालुक्यात बॅटरीवर एक घंटागाडी आहे, तर पनवेल आणि सुधागड तालुक्यात प्रत्येकी दोन घंटागाड्या या बॅटरीवर चालणार्या आहेत. 202 घंटागाड्या या इंधनावर चालवल्या जात आहेत.
| तालुका | ग्रामपंचायत | घंटागाडी आहे | घंटागाडी नाही |
| अलिबाग | 62 | 20 | 42 |
| कर्जत | 54 | 11 | 43 |
| खालापूर | 44 | 20 | 24 |
| महाड | 134 | 9 | 125 |
| माणगाव | 74 | 10 | 64 |
| म्हसळा | 39 | 00 | 39 |
| मुरूड | 24 | 06 | 18 |
| पनवेल | 71 | 36 | 35 |
| पेण | 65 | 07 | 58 |
| पोलादपूर | 42 | 00 | 42 |
| रोहा | 64 | 08 | 56 |
| श्रीवर्धन | 43 | 02 | 41 |
| सुधागड | 33 | 02 | 31 |
| तळा | 25 | 00 | 25 |
| उरण | 35 | 23 | 12 |
| एकूण | 809 | 154 | 655 |







