पहिल्याच पावसाने केली पोलखोल

मेटकर्णी परिसरात गटारातील कचरा रस्त्यावर

| श्रीवर्धन | वार्ताहर |

शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा झालेलेच पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे श्रीवर्धन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस जोरदार पडल्यामुळे गटारातील पाणी वाहू लागले व गटारामध्ये असलेला प्लास्टिकचा कचरा मेटकर्णी परिसरातील रस्त्यावरती सर्वत्र पसरलेला पाहायला मिळत होता. आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये डम्पिंग ग्राउंड अद्यापपर्यंत अस्तित्वात नाही. पण लोकसंख्या जास्त असल्यामुळे कचरा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा होतो.

अनेक नागरिक श्रीवर्धन दिघी रोडवर गोखले कॉलेजच्यासमोर सदरचा कचरा टाकताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी मोठमोठे कचर्‍याचे व प्लॅस्टिकचे ढीग जमलेले नजरेस पडतात. वास्तविक पावसाळा सुरू होण्याअगोदर मेटकर्णी परिसरातील गटारांमध्ये असलेला कचरा ग्रामपंचायतीने काढून गटारे स्वच्छ करणे गरजेचे होते. परंतु अशा प्रकारे कोणतीही कामे झाले नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा प्लास्टिकच्या पिशव्या गटारामध्ये अडकल्यानंतर त्या ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. परंतु, श्रीवर्धन तालुक्यात प्लास्टिक बंदी कोणत्याही ठिकाणी राबवलेल्याचे दिसून येते नाही. श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतसुद्धा सर्व दुकानदार सर्रासपणे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ग्राहकांना प्लास्टिकची पिशवी देत असतात. तरी श्रीवर्धनचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी प्लास्टिक बंदी अतिशय काटेकोरपणे राबवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून तालुक्यात कोठेही असे प्रकार घडणार नाहीत.

दरम्यान, याबाबत संबंधीत ग्रामपंचयातीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Exit mobile version