आराठी ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा देखील आहे. शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनेक लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी येत असतात. परंतु महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील रस्त्यावर आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये नवीन झालेल्या इमारतीतील रहिवासी संपूर्ण ओला व सुका कचरा गटारांमध्ये फेकत असल्याने त्या ठिकाणी कचर्याचे ढीग पाहायला मिळत आहेत.
श्रीवर्धन दिघी मार्गावरती आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाच ते सहा इमारती नव्याने झालेल्या आहेत व या इमारतीमध्ये अनेक रहिवासी रहायला देखील आलेले आहेत. परंतु आराठी ग्रामपंचायत सदर रहिवाशांचा कचरा उचलण्यासाठी घंटागाडी त्याठिकाणी पाठवत नाही. त्यामुळे येथील रहिवासी कचरा रस्त्यावर फेकत आहेत. सदर कचर्याच्या दुर्गंधीमुळे गोखले महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. तरी श्रीवर्धनच्या गटविकास अधिकार्यांनी आराठी ग्रामपंचायतीला सदरचा कचरा तातडीने उचलणे बाबत सूचना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.