प्रवेशद्वाराजवळ दुर्गंधी; फेरीवाल्यांकडून खुलेआम कचराफेक
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार सध्या कचऱ्याचे थरारक दृश्य सादर करतोय. रोज हजारो चाकरमानी, विद्यार्थी आणि नागरिक याच मार्गाने प्रवास करत असताना त्यांना कचरा, दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात फेरीवाले बेधडकपणे कचरा टाकतात आणि त्यावर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नाही, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. दुर्गंधीमुळे काही वेळ थांबणंही कठीण होत आहे.
रेल्वे स्टेशन म्हणजे शहराचा चेहरा असतो, पण पनवेलचा चेहरा सध्या घाणीत बुडालेला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
या अस्वच्छतेमुळे डास, आजार, आणि अपघातांचा धोका वाढला आहे. महसूल मिळवणाऱ्या रेल्वे स्थानकाजवळ अशी स्थिती असणे लज्जास्पद आहे, असंही नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करावी, कचरा उचलण्याची नियमित यंत्रणा असावी, प्रवेशद्वार परिसरात सीसीटीव्ही व चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे.







