उरणमधील ग्रामपंचायतींचा कचरा प्रश्‍न ऐरणीवर

। उरण । वार्ताहर ।

देशात स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सुरू असताना उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ढिसाळ नियोजनामुळे कचरा प्रश्‍नाचे तीनतेरा वाजले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात असल्याने रस्ते डम्पिंग पथ बनू लागले आहेत.

मुंबई नजिकच्या उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या जनतेचा श्‍वास कोंडला जात आहे. प्रवाशांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या उरण तालुक्यातील चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड, सारडे, पिरकोन वशेणी, पुनाडे, पानदिवे, खोपटा, तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमधील नागरिक ओल्या-सुक्या कचर्‍याचे नियोजन न करता हा कचरा रस्त्यावर टाकत आहेत. ओला कचरा मोठ्या प्रमाणात कुजत असून या कचर्‍यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

स्वच्छता अभियानाचे उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील नागरिक तीनतेरा वाजवीत आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्वच्छतेसाठी उरण तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासनसुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. उरण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओला कचरा, सुका कचरा वेगळा करावा, शिवाय असलेल्या ओल्या कचर्‍याचे कंपोस्टिंग करावे, अशी जनजागृती करण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतींना हक्काचे डम्पिंग ग्राउंड नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात कचर्‍याचे विघटन करता येईल, अशी सेवादेखील नाही. परिणामी ग्रामीण भागातील नागरिक गावातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. येत्या काळात पावसाळा सुरू होणार असून या कचर्‍याची समस्या पावसाळ्यात अधिक गंभीर होणार आहे.

उरण तालुक्यात डम्पिंग ग्राउंड विरहित कचरा व्यवस्थापनाकडे ग्रामपंचायतींची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कचर्‍याचे विघटन कसे करावे, ओला कचरा, सुका कचरा वेगळा करावा, ओल्या कचर्‍याचे कंपोस्ट करावे व सुक्या कचर्‍याचे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असे प्रयोग करून, उरण तालुक्यातील कचर्‍याचे विघटन करावे, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात येत आहेत.

एस. पी. वाठारकर
गटविकास अधिकारी, उरण
Exit mobile version