। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
माजी जागतिक नंबर वन खेळाडू गार्बाइन मुगुरुझा हिने वयाच्या 30 व्या वर्षी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ती बराच काळ टेनिसपासून दूर असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. मुगुरुझा जानेवारी 2023 पासून टेनिस खेळलेली नाही. तिने शनिवारी माद्रिदमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, मला वाटते की निवृत्त होण्याची आणि माझ्या आयुष्यातील नवा अध्याय उघडण्याची वेळ आली आहे.
ग्रँडस्लॅम फायनलमध्ये विल्यम्स भगिनींचा पराभव करणारी मुगुरुझा ही एकमेव खेळाडू आहे. तिने 2016 मध्ये फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये सेरेना विल्यम्सचा आणि 2017 मध्ये विम्बल्डनच्या फायनलमध्ये व्हीनस विल्यम्सचा पराभव केला होता. तर, स्पॅनिश खेळाडू मुगुरुझाच्या नावावर करिअरमध्ये 10 विजेतेपद आहेत. 2015 विम्बल्डन आणि 2020 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती उपविजेती होती.