लसणाची फोडणी महागली

पंधरा दिवसांत प्रतिकिलो चारशे पार

| अलिबाग | प्रतिनिधी |

दैनंदिन स्वयंपाकात लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे लसणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून लसणाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. एक किलोमागे 400 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे असल्याचे चित्र दिसून आले आहे.

शाकाहारी अथवा मांसाहारी भोजन करताना लसणाची फोडणी द्यावी लागते. त्यामुळे लसणाचा वापर हा नियमित केला जातो. म्हणूनच लसणाला मागणी अधिक असते. महिन्याभरापूर्वी लसणाचा किलोचा दर 120 रुपयांपासून दोनशेपर्यंत होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत 320 रुपयांवरून 400 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली आहे. लसणाची किंमत वाढल्याने स्वयंपाक घरातून लसूण हद्दपार होण्याचे चित्र दिसून येत आहे. सात हजार रुपयांनी 50 किलो लसणाची मिळणारी गोण आता 25 ते 30 हजार रुपयांनी मिळत आहे. लसणाचे दर वाढल्याने त्याची खरेदीदेखील कमी झाली आहे. गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडल्याने अनेक गृहिणींनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसणाची पेस्ट वापरण्यास सुरुवात केली आहे.

लसूण महाग झाल्याने घरातील खर्चाच ताळमेळ बिघडला आहे. लसणाच्या वाढत्या किमतीमुळे स्वयंपाकात लसणाचा वापर कमी केला जात आहे.

पूजा जाधव, गृहिणी


गेल्या पंधरा दिवसात लसणाचे दर प्रचंड वाढले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणीदेखील कमी झाली आहे.

भूषण पाटील, विक्रेते
Exit mobile version