उपोषणाच्या इशार्‍यानंतर गॅस शवदाहिनी सुरू

पत्रकार मित्र असोसिएशनच्या पत्राची दखल

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिका हद्दीतील स्मशानभूमीमध्ये लाकडांवर स्थानिकांना 2500 रुपये, तर बाहेरील नागरिकांना 4200 दराप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत असून, याकरिता नागरिकांची लूट सुरु आहे. पनवेल महापालिकेने हा ठेका उत्कर्ष सामाजिक संस्थेला दिला असून, ठेकेदार यामध्ये मालामाल होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून याबाबत पत्रकार मित्र असोसिएशन या सामाजिक संस्थेने लाक्षणिक उपोषणाचा इशारा नवी मुंबई अध्यक्ष राहुल बोर्डे यांनी पत्र देऊन दिला होता.

पनवेल महापलिका हद्दीतील अमरधाम व पोदी येथील स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त 100 रुपये दर आकरला जातो, मात्र तेच लाकडासाठी 2500 रुपये दर आकारला जातो. कंत्राटदारांनी जनतेच्या फायद्याची गॅस शवदाहिनी मुद्दामहून बंद केली होती, असा आरोप राहुल बोर्डे यांनी केला होता व त्यानुसार गॅस शवदाहिनी सुरु न झाल्यास लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला होता. राहुल बोर्डे यांच्या इशार्‍याने पालिका अधिकारी व कंत्राटदार यांना जाग येऊन त्यांनी त्वरित सर्व स्मशानभूमीमधील गॅस शवदाहिनी सुरु केली.

याबद्दल पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक व राहुल बोर्डे यांनी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख व कंत्राटदार यांचे आभार मानून तूर्तास हे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्याचे पत्रदेखील मेलद्वारे पाठवण्यात येणार असल्याचे राहुल बोर्डे यांनी सांगितले.

Exit mobile version