एका कामगाराचा मृत्यू, 34 कामगार जखमी
| महाड | प्रतिनिधी |
शनिवारी 15 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास महाड एमआयडीसी मध्ये कार्यरत असलेली इंडो अमाईन्स लिमिटेड या कंपनीमध्ये अचानक गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तर, आणखी 33 कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुखरूप घरी नेण्यात आल्याची माहिती आहे.
पाऊस पडत असल्याने पावसाच्या पाण्यावाटे गॅस बाहेर पडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या कामगार वर्गांनाही गॅसची बाधा झाली. जवळपास 35 जण बेशुद्ध अवस्थेत पडल्याने प्रथमोपचार करण्यासाठी महाड एमआयडीसी MMA हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु काही कामगारांची प्रकृती चिंताजनक झाल्याने महाड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन कामगारांना मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
