तळेगाव एमआयडीसीमध्ये गॅस गळती; दोन जणांचा मृत्यू

। पुणे । प्रतिनिधी ।

मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे. यामध्ये दोन कामागारांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला गॅस सिलेंडर स्फोटाची माहिती समोर आली होती, मात्र प्राथमिक माहितीनुसार कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू असून, परिसरात आवश्यक खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. या घटनेमुळे तळेगाव एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version