उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

| उरण | प्रतिनिधी |

मध्यपूर्वेत इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये गॅसच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या असून, त्याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर उरणमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरची विक्री बंद केल्याने हॉटेल व खानावळ व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. गॅस उपलब्ध नसल्याने अनेकांना व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावरही मर्यादा घालण्यात आल्याची माहिती गॅस विक्रेत्यांनी दिली आहे. नवीन नियमानुसार 35 दिवसांत एकच घरगुती सिलिंडर मिळणार आहे. बुकिंग केल्यानंतर चार दिवस त्यानंतर सुमारे 31 दिवसांनी घरपोच सिलिंडर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना घरगुती गॅसचा वापर अत्यंत जपून करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, अलीकडेच एलपीजी गॅसच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ झाली असून, व्यावसायिक सिलेंडरही जवळपास 115 रुपयांनी महाग झाले आहेत. वाढत्या दरांमुळे आणि कमी पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन सिलिंडर बुकिंग होत नसल्याने नागरिकांना गॅस एजन्सीबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत.
यामुळे सिलिंडर संपल्यानंतर स्वयंपाक कसा करायचा, असा प्रश्न अनेक कुटुंबांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी गॅसचा वापर अत्यंत जपून करावा, अशी सूचना गॅस वितरकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version