| उरण | प्रतिनिधी |
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा साखळीवर होत असून, त्याचा थेट फटका घरगुती गॅस सिलिंडर वितरणावर बसला आहे. त्यामुळे उरण तालुक्यात मागील काही दिवसांपासून गॅस वितरणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि गॅस वितरण कंपन्यांकडून प्रयत्न सुरू असून, वितरण हळूहळू सुरळीत होत असल्याची माहिती समोर आली आहे.
उरणमध्ये सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण शासकीय नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. ग्राहकांना प्राधान्याने सिलिंडर उपलब्ध करून दिले जात असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. गेल्या काही दिवसांत काही ठिकाणी सिलिंडर उशिरा मिळणे, तर काही ठिकाणी वितरणात विलंब होणे अशा तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र, आता परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, वितरण कंपन्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, आवश्यक तेवढाच गॅस वापरण्याचे सुचवले आहे. गॅस बुकिंग आणि वितरण प्रक्रियेत संयम बाळगण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.







