कंपनीविरोधात कामगारांचा गेटबंद आंदोलन

| उरण | वार्ताहर |
कामगारांच्या कोणत्याही मागण्या मान्य करीत नसल्याने उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सीडब्ल्यूसी) या कंपनीविरोधात स्थानिक भूमीपुत्रांनी 27 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. परंतु, कंपनी प्रशासनाकडून कोणतीही दखल ने घेतल्याने मुजोर, मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा निषेध करीत शेकडो कामगारांनी शुक्रवारी गेटबंद आंदोलन करीत जाहीर निषेध केला.

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळावे, प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळावा आदी विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून पाचशेहून अधिक कामगार साखळी उपोषणास बसले आहेत. परंतु, कंपनी प्रशासनाचा कोणी अधिकारी साखळी उपोषण स्थळी फिरकला नाही. साधी कामगारांची विचारपूस सुद्धा केली नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी सर्वच राजकीय पाठिंब्याने रायगड श्रमिक संघटना तसेच न्यू मेरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सीब्लूसी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून पोलारीस कंपनीच्या गेटसमोरच उन्हात बसून, भूकेची तहानाची पर्वा न करता गेट बंद आंदोलन करून आपला जार निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मागच्या पूर्ण होत नाहीत, लेखी आश्‍वासन मिळणार नाही गेट बंद आंदोलन सुरूच ठेवू, असा निश्‍चय यावेळी बेरोजगार कामगारांनी केला.

या आंदोलनाला माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक, महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गेट बंद आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. पोलीस प्रशासनातर्फे न्हावा शेवा बंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस संदीपान शिंदे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आदींनी मध्यस्थी करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही. आंदोलन स्थळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Exit mobile version