| उरण | वार्ताहर |
जेएनपीए प्रशासनाकडून पुनर्वसनासह मुलभूत नागरी सुविधांची पुर्तता न होणे. शिवाय अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. 15 एप्रिल 2023 पासून बोटी नांगरून जेएनपीटी प्रशासनाचा निषेध करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी जाहीर केला आहे. ग्रामस्थांच्या विविध मागण्या 38 वर्षे प्रलंबित असून, प्रशासन ग्रामस्थांच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत केले जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोरा ते घारापुरी परिसरात कुटुंबांसह बोटी नांगरून निषेध केला जाणार आहे.
शेवा कोळीवाडा गावातील जेएनपीए प्रकल्प विस्थापित 86 शेतकरी व 170 बिगर शेतकरी 256 कुटुंबाचे शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन केले जात नाही,असा या ग्रामस्थांचा आरोप आहे.हे सर्व प्रकल्पग्रस्त 8 जानेवारी 2023 पासून शेवा कोळीवाडा गावात रहात आहेत. शेवा कोळीवाडा गावातील 17 हेक्टर जमीन साफसफाई करून मंजूर नकाशानुसार भूखंडाची आखणी करणार आहेत.शासनाने जेएनपीएकडून नागरी सुविधांसाठी फंड घेतलेला आहे. त्या फंडातून शेवा कोळीवाडा गावात मूलभूत नागरि सुविधा पूर्ववत करण्याबाबत ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा यांनी शासनाला कळविले आहे. त्यावर शासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही याचा निषेध आतापर्यंत विविध माध्यमातून करण्यात आला आहे.