गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मेरिटाईम बोर्डाचा निर्णय

| रायगड | प्रतिनिधी |

गेटवे मांडवा जलवातूक तब्बल तीन महिन्याच्या बंदीनंतर 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरूडमधील चाकरमान्यांसाठी हा सर्वात सोईचा मार्ग आहे. मांडवा बंदरातील जेट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ही जेट्टी काही दिवसांतच बंदरात आल्यानंतर निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असे जलवाहतूक संस्थांचे मत आहे.

मॉन्सूनच्या आगमनाबरोबरच गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंतची फेरीबोट सेवा बंद करण्यात आली होती. मेरीटाईम बोर्डने 1 सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतूक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. मांडवा बंदरातील तरंगत्या जेट्टीचे दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. लाटांचा मारा आणि खाऱ्या पाण्यामुळे या जेट्टीची नादुरुस्ती झालेली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जेट्टीची डागडुजी केली जात आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा हा सर्वात लोकप्रिय जलवाहतूक मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासीसंख्याही वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जलवाहतुकीची सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही आपल्या बोटीची दुरुस्ती पूर्ण करावी. त्यावर पुरेशा संख्येने लाईफ जॅकेट असावेत, सुरक्षा साधणाच्या उपाययोजना असाव्यात, अशा सूचना मेरिटाईम बोर्डने दिल्या आहेत. या सेवेवर अलिबाग, मुरूड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय अवलंबू असल्याने फेरीबोट सुरू होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

Exit mobile version