| अलिबाग | प्रतिनिधी |
सात दिवसांच्या बाप्पाला, गौराईसह मंगळवारी (दि.2) जड अंतःकरणातून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. सात दिवस बाप्पासह गौराईची मनोभावे पूजा, आरती करण्यात आली. मंगलमय व आनंदमय वातावरणात मनोभावे सेवा करण्यात आली. यंदा रायगड जिल्ह्यातील समुद्र, तलाव, नदींसह कृत्रिम तलाव अशा एकूण 500 पेक्षा अधिक ठिकाणी 72 हजार 643 गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. यादरम्यान मिरवणूक व विसर्जन सोहळा आनंदमय वातावरणात साजरा व्हावा, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये बुधवार दि.27 ऑगस्ट रोजी 1 लाख 2 हजार 484 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना झाली. गुरुवार दि.28 ऑगस्ट रोजी दीड दिवसाच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. त्यावेळी तलाव, समुद्रासह नदींमध्ये 25 हजार 551 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनांनंतर रविवारी (दि.1) घरोघरी गौराईचे आगमन झाले. यावेळी 16 हजार 175 गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. गौराईला सोमवारी (दि.2) भाजी, भाकरीचा नैवेद दाखवून पारंपारिक पेहराव करीत असंख्य सुवासिनींनी गौराईचे पूजन केले. यादरम्यान गणेशोत्सवासह गौराईच्या आगमनाच्या निमित्ताने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी धावऱ्या (जाखडी) नाच या पारंपारिक नृत्याबरोबरच, कुस्ती स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. महिला वर्गानेदेखील गौराईच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत केले. त्यांच्याकडून वस्त्रालंकाराचा साजशृंगार चढवून मुर्ती व मुखवट्याची पुजा करण्यात आली. नाचगाणी, फुगड्या आदी खेळांनी जिल्ह्यात रंगत आणली. पारंपारिक नृत्याबरोबरच मनोरंजनात्मक, भजन किर्तनाचे धार्मिक कार्यक्रम घेऊन गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली.
जिल्हयामध्ये गणेशमुर्तींसह गौरीची मूर्ती व मुखवट्यांचे विसर्जन मंगळवारी (दि.2) केले जाणार आहे. गौराई व गणपतीची मूर्ती डोक्यावर किंवा गाडीवर नेऊन मिरवणूका काढल्या जाणार आहेत. काही ठिकाणी मिरवणूका स्पीकर, खालू बाजे व बेंजोच्या तालावर काढल्या जाणार आहेत. यावेळी 56 हजार 468 गणेशमूर्ती व 16 हजार 175 गौरीच्या मूर्ती व मुखवट्यांचे विसर्जन 500हून अधिक ठिकाणी केले जाणार आहे. मिरवणूक सोहळ्याचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा व्हावा, यासाठी ग्रामीण भागासग शहरी भागात जोरदार तयारी करण्यात आली आहे.
दोन हजार पोलिसांची नजर
रायगड जिल्ह्यात आज सात दिवसांच्या गणरायासह गौरीचे विसर्जन करण्यात येणार आहे. या कालावधीत ठिकठिकाणी मिरवणूका देखील काढण्यात येणार आहेत. ढोल ताशांसह डिजेच्या तालावर अनेकजण नाचणार आहेत. त्यामुळे मिरवणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रायगड पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी 2 हजार 800 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड जवान तैनात करण्यात येणार आहेत.
वाद घालणाऱ्यांना दणका
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा अधिनियम अंतर्गत 1 हजार 150 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या प्रत्येक संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे. यापूर्वी मिरवणूकीत वाद घालणाऱ्यांना दणका देण्यात आला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.
सात दिवसांच्या गणरायासह गौराईला मंगळवारी निरोप देण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणूकीसह विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वयोवृध्द, लहान मुले व महिलांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मिरवणूकीत लेझर प्रतिबंधित आहेत. त्यामुळे त्याचा वापर करू नये. हा सण आनंदात व शांततेत साजरा करा.
– आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड
