मुरुडमध्ये 2287 गणपतींचे विसर्जन
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना’ आम्हाला अशा भावपुर्ण घोषणा देत मंगलमय वातावरणात गौरीगणपतीला संपुर्ण तालुक्यात गणेशभक्तांनी निरोप दिला. त्यावेळी भक्तजन गणरायाकडून पुढल्या वर्षी लवकर येण्याचे वचन घ्यायला विसरले नाहीत.

गेले पाच दिवसांपासुन गणेशभक्तांना सकारात्मक ऊर्जा व आनंद देणार्या गणरायाला निरोप देतांना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर अशा मंगलमय वातावरणात मुरुड तालुक्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला.

मुरुड पोलीस ठाण्याहद्दीतील 2287 गणपती व 350 गौरींचे विसर्जन करण्यात आल्या. यावेळी मुरुड पोलीस निरीक्षक नितिन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे, सहायक फौजदार दिपक राऊळ आदींसह पोलिसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुरूड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या सुचनेनुसार मुरुड समुद्रकिनारी विसर्जन करण्याकरिता 10 जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. याठिकाणी नगरपरिषदेचे अधिकारी प्रकाश आरेकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
रसायनी व परिसरातील भक्तांचे डोळे पाणावले
। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी व परिसरातील गौंरी-गणपतींचे सोमवारी सायंकाळी भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. पाताळगंगा नदी, मोहोपाडा तलाव, रिस पुल, कांबे गणेश घाट, वावेघर गणेश घाट आदी ठिकाणी भजने गावून पाच दिवसांच्या गणेशांचे तर गौराईंचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भक्तांचे डोळे पाणावले होते.

रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 1412 घरगुती गणपती व 152 गौराईचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोहोपाडा येथील नागरिकांनी मोहोपाडा तळावावर जल्लोषात गणपती विसर्जन केल्यानंतर ग्रामस्थ मोहोपाडा गावात एकत्र जमले. यानंतर महिलांनी गौराई गीत गात विसर्जन मिरवणूक काढली. मोहोपाडा श्री दत्त मंदिराजवळ गौराईचे आगमन होताच पुरुषांनी ढोल ताशाच्या आवाजावर गौराई गाण्यांवर नृत्य केले. बाप्पांना निरोप देताना लहान मुलांसह कुटूंबातील सदस्य भावूक झाले होते. पावसाने उघडीप दिल्याने विसर्जन सोहळ्यात कोणतेही विघ्न आले नाही. मात्र लाडक्या एकदंताला निरोप देताना भाविकांचा कंठ दाटून आल्याचे चित्र विसर्जनस्थळी पहावयास मिळाले.
तळा शहरात उत्साही वातावरणात गणरायाला निरोप
। तळा । प्रतिनिधी ।
तळा शहरातील पाच दिवसांच्या गौरी गणपतींना सोमवारी उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. यावर्षी तळा शहरात 2710 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांमुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत होता. परंतु यावर्षी कोणतेही निर्बंध लागू नसल्याने जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

गणेशोत्सवासाठी शहरातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी परतले होते. पाच दिवस भक्तिभावाने गणरायाची आरती तसेच पूजा अर्चा करून सोमवारी त्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. कोणी डीजेच्या तालावर, कोणी खालुबाजाच्या तालावर तर कोणी टाळ ढोलकीच्या गजरात भजन गात बाप्पाची मिरवणूक काढली. शहरातील गणपतींचे मोदी तलाव, महादेव तलाव, पुसाटी तलाव या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. तसेच नगरपंचायतीकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्याला देखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी निर्माल्य कलशही ठेवण्यात आले होते. सुरक्षिततेच्यादृष्टिने होमगार्ड, पोलीस यंत्रणांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे सहकार्यांसह कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विसर्जन मिरवणुकांवर लक्ष ठेऊन होते.