। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात गेले पाच दिवस आनंदात राहणार्या बाप्पाला आणि काल पाहुणी म्हणून आलेल्या गौराई मातेला सोमवारी निरोप देण्यात आला. तालुक्यांत पाच दिवसांच्या 5800 गणपती बाप्पा तसेच 2870 गौरींचे विसर्जन करण्यात आले.दरम्यान, तालुक्यातील 11 सार्वजानिक गणेश उत्सव मंडळांचे गणपतींचेदेखील विधिवत विसर्जन करण्यात आले. तर नेरळ येथील मुस्लिम मस्जिद समोर गणेशभक्तांना गुलाब पुष्प देण्याचा सोहळा संपन्न झाला.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1410 आणि कर्जत पोलीस ठाणे हद्दीत 1480 गौरी यांचे पूजन झाले होते. तर पाच दिवसांचे 2120 गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तसेच चार सार्वजनिक गणपती देखील बसविण्यात आले होते. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत पाच दिवसांचे 3680 बाप्पांचे आगमन झाले होते. कर्जत नगरपरिषद हद्दीतील गणपतींना उल्हास नदीमधील वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. त्यासाठी कर्जत नगरपरिषदेकडून कर्जत शहरात मुद्रे, दहीवली, महावीर पेठ तसेच शनी मंदिर येथे असलेल्या गणेश घाटांवर आणि गुंडगे तसेच भिसेगाव येथे नियोजन करण्यात आले होते.
नगरपरिषदेकडून सर्व गणेश विसर्जन घाटांवर विजेची रोषणाई, बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी पालिका पदाधिकारी आणि अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील गणेश घाट येथे शेकडो गणेशभक्तांसाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. तेथे ग्रामपंचायत कर्मचार्यांकडून विसर्जनासाठी आलेल्या बाप्पांना होडीमधून खोल पाण्यात नेवून विसर्जन केले जात होते. हा सोहळा रात्री अकरापर्यंत सुरू होता. मुस्लिम समाजाचे नेते आणि माजी सरपंच आयुब तांबोळी आणि माजी सदस्य जयद नजे यांच्या माध्यमातून हा सोहळा अनेक वर्षे सुरू आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील गावात शांततेत विसर्जन सोहळा व्हावा, यासाठी एसआरपीएफची तुकडी तसेच नव पोलीस आणि होमगार्ड तैनात होते. शिवाय चार अधिकारी देखील बंदोबस्तात मग्न होते. कर्जत पोलीस ठाणे येथे एसआरपीएफ तसेच शीघ्र कृती दल आणि पोलीस तसेच होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, कर्जतचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे, नेरळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि माथेरानचे शेखर लव्हे यांनी बंदोबस्त कायम ठेवला होता.